अकोला : दि. 14 ऑगस्ट — अकोट तालुक्यातील ग्रामपंचायत अकोली जहागींर येथे प्लास्टिक वर प्रक्रिया करण्यासाठी टाकावू प्लास्टीक व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला असून तालुक्यातील 147 गावातील प्लास्टिक वर प्रक्रिया करुन त्याद्वारे रोजगार निर्मिती व गावांना प्लास्टीक कच-यापासून मुक्ती मिळणार आहे. आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाकरीता पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता तेलंग, यांच्यासह गट विकास अधिकारी माया वानखडे, उपसरपंच पंकज ढेंबरे सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश खुमकर, विस्तार अधिकारी मदन बहूरे आदि उपस्थित होते.
या वेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना सिईओ अनिता मेश्राम पुढे म्हणाल्या की, प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. प्लास्टिक व प्लास्टिकच्या कच-यामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. याला आळा घालण्यासाठी अकोला जहागीर येथील टाकावू प्लास्टीक व्यवस्थापन प्रकल्प तालुक्यासाठी लाभदायक ठरणार आहे. तालुक्यातील सर्व गावातील प्लास्टिक कचरा निर्मुलनासाठी लाभदायक ठरणार आहे. प्लास्टिकचा पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करणे आणि प्लास्टिकचे वापर कमी करणे हे सुत्र ग्रामस्थांनी स्विकारावे व गाव स्तरावर याची जनजागृती करावी आणि या उपक्रमामध्ये सर्वांना सहभागी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 8 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत “हर घर तिरंगा हर घर स्वच्छता” या उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्या अंतर्गत नव्याने कार्यान्वीत या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच गावात तिरंगा रॅली, वृक्षारोपन, सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन, उमेदच्या प्रभागसंघ कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अनिता तेलंग, गट विकास अधिकारी माया वानखडे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश खुमकर यांनी केले तर सुत्र संचालन व आभार प्रदर्शन उपसरपंच पंकज ढेंमरे यांनी केले.
असा काम करेल प्रकल्प : ग्रामपंचायत अकोली येथे बांधकाम करण्यात आलेल्या टाकावू प्लास्टीक व्यवस्थापन प्रकल्पामध्ये 147 गावातून प्लास्टिक प्रत्येक ग्रामपंचायतमार्फत आणून दिले जाईल. शेडमध्ये प्लास्टिक संकलित करण्यात येईल. त्याचे वर्गिकरण करुन त्यावर प्रक्रिया करून त्याची पावडर, बारीक तुकडे तयार होवून पॅकींग करुन त्याचा पुनर्वापर करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.
या वेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कश्रातील सल्लागार प्रविण पाचपोर, सागर टाकळे, समुह समन्वयक शिवशंकर उन्हाळे, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र तायडे, ग्रामपंचायत सदस्य अरुण खन्नाडे, मनीषा धर्मे सचिन इंगळे, सचिन धुळे, संगीता ढेमरे तसेच इतर सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, बचत गटाच्या महिला सदस्य, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी, नलजल मित्र, स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.
प्लास्टिक कच-याचे होणार व्यवस्थापनअकोट तालुक्यातील 147 गावातील प्लास्टीक वर होणार प्रक्रिया मु.का.अ. अनिता मेश्राम यांचे हस्ते उद्घाटन
