बार्शीटाकळी : पंचायत समिती बार्शीटाकळी येथील लेखाधिकारी यांच्याविरुद्ध गंभीर आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारींचा पाऊस पडत असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित लेखाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात निधी अपहार केल्याचे आरोप विविध स्तरावरून करण्यात आले असून याबाबत अनेक तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे दाखल झालेल्या आहेत.
विशेष म्हणजे, या प्रकरणात केवळ एक-दोन नव्हे तर अनेक नागरिक, पदाधिकारी आणि संबंधित घटकांनी वेळोवेळी लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई होणे अपेक्षित असताना प्रशासनाचे मौन अनेक प्रश्न निर्माण करत आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विजय देशमुख यांनी देखील अधिकृत तक्रार जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केली असून, “सार्वजनिक निधीचा गैरवापर हा अत्यंत गंभीर विषय आहे. जर अशा प्रकारच्या तक्रारींकडे प्रशासन डोळेझाक करत असेल, तर यामागे काहीतरी मोठे दडलेले आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे पंचायत समितीच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पारदर्शकतेचा पूर्णतः अभाव असल्याचे चित्र समोर येत आहे. नागरिकांच्या पैशांचा हिशोब मागणाऱ्यांनाच उत्तर मिळत नसल्याने लोकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
आता या गंभीर आरोपांवर जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेते, दोषींवर कारवाई होते का, की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बार्शीटाकळी पंचायत समितीत आर्थिक गैरव्यवहार? लेखाधिकारीवर गंभीर आरोप; प्रशासनाचे मौन संशयास्पद
Oplus_16777216
