अकोला : जिल्हा परिषद अकोला अंतर्गत पंचायत विभागाचा अतिरिक्त प्रभार बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकांत पवार यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकाच अधिकाऱ्याकडे दीर्घकाळ प्रभार ठेवण्यामागचे नेमके कारण काय, असा सवाल आता उघडपणे उपस्थित होत आहे.
स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार, बार्शीटाकळी पंचायत समितीतील अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित असून विकासकामांची गती मंदावली आहे. विविध योजना, निधी प्रस्ताव, मंजुरी प्रक्रिया आणि प्रशासकीय निर्णय यामध्ये सतत विलंब होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे सामान्य जनतेला थेट फटका बसत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, हा अतिरिक्त प्रभार तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येतो; मात्र संबंधित अधिकाऱ्याकडे तोच प्रभार वर्षानुवर्षे कायम ठेवण्यात आल्याने प्रशासनातील नियोजनशून्यता उघड होत असल्याची चर्चा आहे. यामुळे “तात्पुरता” हा शब्दच केवळ कागदोपत्री राहिल्याची टीका होत आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, संबंधित विभागात समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसत असल्याचे जाणकारांचे मत आहे. यामुळेच पंचायत समिती पातळीवरील कामकाजावर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून हा प्रभार तातडीने काढून स्वतंत्र अधिकारी नेमण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा प्रलंबित कामांचा ढिग वाढत जाऊन विकास प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने याप्रकरणी तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही काही संघटनांनी दिल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासन या गंभीर बाबीकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अकोला जिल्हा परिषदेत ‘एकाच अधिकाऱ्याकडे प्रभार’; बार्शीटाकळीतील कामकाज ठप्प – प्रशासन झोपेत?
Oplus_16777216
