अकोट (प्रतिनिधी) – पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत आकोलखेड येथे १५ वा वित्त व दलीत वस्ती योजने च्या कथित आर्थिक अपहार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीवरच आता संशयाची छाया पडली असून, तक्रारदारांनी समितीने चौकशी अहवाल दडपल्याचा गंभीर आरोप केला आहे.
उपसरपंच गोवाल मधुकर भोरखडे यांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीत विविध कामे व साहित्य खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः सीसीटीव्ही कॅमेरे व आरओ कॅन खरेदीत बाजारभावापेक्षा अनेक पटीने वाढीव दराने बिले सादर करण्यात आल्याचा आरोप आहे. उदाहरणार्थ, बाजारात सुमारे ५०० रुपयांना मिळणारी आरओ कॅन १३82 रुपयांनी दाखवण्यात आल्याचे सांगितले आहे.
तसेच, काही साहित्य प्रत्यक्षात खरेदीच न करता केवळ बिले सादर केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय, दलित वस्ती सुधार निधी ज्या ठिकाणी खर्च होणे आवश्यक होते, त्या ठिकाणी निधीचा वापर न झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. मात्र, समितीने सखोल तपास न करता अहवाल दडपून प्रकरण ‘गुंडाळल्याचा’ आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे आता चौकशी समितीच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तक्रारदारांचे म्हणणे आहे की, या प्रकरणात केवळ प्राथमिक चौकशी न करता चौकशी समितीच्या भूमिकेचीही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. जर निष्पक्ष तपास झाला, तर मोठ्या प्रमाणात झालेला आर्थिक अपहार उघडकीस येऊ शकतो.
यामुळे संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता राखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून नव्याने सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
