बोरगाव मंजू, प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘महाविस्तार AI’ अॅपच्या प्रसारासाठी अकोला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती व प्रचार-प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बुधवार, दिनांक २२ एप्रिल रोजी बोरगाव मंजू येथे प्रभावी उपक्रम पार पडला.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत कृषी विभागाच्या सुमारे ३५ अधिकाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला. दिवसभर गावात फिरून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत ‘महाविस्तार AI’ अॅपची सविस्तर माहिती देण्यात आली.
या उपक्रमादरम्यान जवळपास ४०० शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये ‘महाविस्तार AI’ अॅप डाउनलोड करून देण्यात आले. अॅपच्या माध्यमातून पीक व्यवस्थापन, रोगनियंत्रण, अचूक हवामान अंदाज, विविध शासकीय योजना तसेच तांत्रिक मार्गदर्शन सहज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले.
या मोहिमेमुळे डिजिटल कृषी सेवा थेट गावपातळीपर्यंत पोहोचविण्यास मोठी चालना मिळाली आहे. भविष्यातही अशाच प्रकारच्या जनजागृती मोहिमा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी दिली.
कार्यक्रमाचे नियोजन बोरगाव मंजूचे सहायक कृषी अधिकारी संजय जाधव, अजय देशमुख व कु. वैशाली इंगळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. तसेच मंडळ कृषी अधिकारी विजय वानखेडे यांनी घरोघरी भेट देत शेतकऱ्यांना ‘महाविस्तार AI’ अॅपचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी अकोला तालुक्यातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी व सहायक कृषी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला तालुक्यात ‘महाविस्तार AI’ अॅपची व्यापक जनजागृती मोहीम यशस्वी
