Join WhatsApp group

जवाहर नगरात घंटा गाडी सेवा बंद; नागरिक त्रस्त – महापौरांना निवेदन


अकोला (प्रतिनिधी) : शहरातील जवाहर नगर परिसरात घरगुती कचरा संकलन (घंटा गाडी) सेवा गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी करत श्रीमती आशा श्रीकांत पिसे पाटील यांनी महानगरपालिकेच्या महापौरांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जवाहर नगर येथे यापूर्वी घरगुती कचरा संकलन सेवा नियमितपणे सुरू होती. मात्र, गेल्या काही काळापासून घंटा गाडी येणे पूर्णपणे बंद झाल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परिणामी दुर्गंधी पसरत असून माशा व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागरिकांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन घंटा गाडी सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच, ही सेवा नियमित व वेळेवर चालू ठेवण्यासाठी संबंधित विभागाने योग्य देखरेख ठेवावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, मनपाने या गंभीर समस्येची दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *