अकोला – आगामी काळात पक्षसंघटन अधिक मजबूत करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढविणे आवश्यक असल्याचे मत मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी व्यक्त केले. संपर्क अध्यक्षपदाची नियुक्ती झाल्यानंतर अकोला दौऱ्यावर आले असता, स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.
यावेळी त्यांनी सर्वप्रथम सदस्य नोंदणी अभियानावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून संघटना विस्तार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने काम करावे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात मनसेची सक्षम व प्रभावी उपस्थिती निर्माण करून भविष्यात मजबूत विरोधी पक्ष म्हणून उभे राहण्यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी आवाहन केले.
या बैठकीस मनसे जिल्हाध्यक्ष राजेश काळे, पंकज साबळे, महानगर अध्यक्ष सौरभ भगत, राकेश शर्मा, जिल्हा सचिव ललित यावलकर, उपाध्यक्ष सतीश फाले, मनविसे जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड, सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष संजयजी पळसकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कराळे, शेख निसार, डॉ. प्रशांत लोथे, महिला आघाडीच्या सौ. प्रशांसा अंबेरे, सौ. गमे, विजय बोचरे, चंदू अग्रवाल तसेच प्रसिद्धी प्रमुख प्रेम पाटील मगर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षसंघटन बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे : हेमंत गडकरी
