अकोला (प्रतिनिधी) – सामाजिक वनीकरण विभागाकडून न्यायालयीन आदेशांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप करत दोन रोजंदारी मजुरांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. विजय हिरासिंग राठोड यांनी दिनांक ६ एप्रिल २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
सन १९८५-८६ पासून सामाजिक वनीकरण विभागात काम करत असलेल्या या दोन्ही मजुरांना त्यांच्या सहकाऱ्यांप्रमाणे कायम न करता वारंवार डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात त्यांनी औद्योगिक न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणात दिनांक ९ मे २०२४ रोजी न्यायालयाने स्पष्ट आदेश देत दोघांना नियमित सेवेत सामावून घेऊन सर्व लाभ देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.
मात्र, दीड वर्ष उलटूनही प्रशासनाकडून आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर, न्यायालयाच्या आदेशानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाचे पत्र दाबून ठेवले, ही बाब माहिती अधिकारातून उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
आंदोलनाचा इशारा: न्यायालयीन आदेश धाब्यावर, मजुरांचे आमरण उपोषण सुरू
