पातूर : तालुक्यात मोठ्या अपेक्षेने आयोजित करण्यात आलेली दिग्रस येथील आमसभा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अक्षरशः कोलमडली. बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडणारी ही महत्त्वाची सभा, संबंधित जबाबदार अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे सुरू होण्यापूर्वीच तहकूब करण्याची नामुष्की ओढवली.
सभेसाठी ना योग्य नियोजन, ना अधिकृत निमंत्रण, ना आवश्यक व्यवस्था — अशा सर्वच पातळ्यांवर प्रशासन पूर्णतः अपयशी ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले. अनेक सरपंचांना निमंत्रणच न मिळाल्याने ते अनुपस्थित राहिले, तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि जिल्हास्तरीय अधिकारी देखील गायब होते. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या सभेतच अधिकारी दांडी मारत असतील, तर हा प्रकार प्रशासनाच्या निष्क्रियतेचा कळस असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या आमदार नितीन देशमुख यांनी कार्यक्रमस्थळीच नाराजी व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला. आवश्यक सुविधा नसणे, महापुरुषांच्या प्रतिमांचा अभाव, आणि एकूणच अस्ताव्यस्त व्यवस्थेमुळे त्यांनी स्वागतही नाकारत प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढले.
दरम्यान, जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आयोजित केलेली ही सभा रद्द झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आमच्या प्रश्नांचा बळी जात आहे,” अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे आमदारांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा सवालही आता उपस्थित होत आहे.
शेवटी ही सभा ९ एप्रिल २०२६ रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी त्या दिवशी तरी सर्व अधिकारी जबाबदारीने हजर राहणार का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे पातूर तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
प्रशासनाच्या बेफिकीरीचा कळस! अधिकारी गैरहजर, पातूरची आमसभा कोलमडलीनिमंत्रणाचा गोंधळ, समन्वयाचा बोजवारा – जनतेच्या प्रश्नांवर पाणी फेरलं
