Join WhatsApp group

प्रवीण भोटकर यांना राज्य शासनाचा “महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” जाहीर


व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल; २५-२६ मार्च रोजी मुंबईत भव्य सन्मान
अकोला, :
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय व मौलिक कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना दिला जाणारा प्रतिष्ठेचा “राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” सन 2021 ते 2025 या कालावधीसाठी जाहीर करण्यात आला असून, सन 2023-24 या वर्षातील सामाजिक कार्यकर्ता गटातील हा पुरस्कार अकोला जिल्ह्यातील पारस येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भोटकर यांना जाहीर झाला आहे.
प्रवीण भोटकर हे उच्चशिक्षित असून सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव आणि प्रभावी कार्य उभारले आहे. महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर रुग्णसेवकांचे मजबूत जाळे उभे केले आहे. तसेच, त्यांनी संस्थापक अध्यक्ष असलेल्या संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था, पारस अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत.
विशेषतः युवकांना व्यसनमुक्त करून त्यांना सकारात्मक व आनंदी जीवनाकडे वळविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय मानले जात आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ तसेच प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २५ व २६ मार्च रोजी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबई येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असून, विविध स्तरांतून प्रवीण भोटकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *