अकोला |
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत काही आरोग्य सेवक मुख्यालयात राहत नसतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यालयात राहत असल्याची खोटी माहिती देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आकाश कोकाटे यांनी केला आहे.
नियमाप्रमाणे आरोग्य सेवकांना आपल्या कार्यक्षेत्राच्या मुख्यालयात राहणे बंधनकारक असताना काही जण मात्र मुख्यालय सोडून इतरत्र वास्तव्यास राहून कागदोपत्री मुख्यालयात असल्याचे दाखवत असल्याची चर्चा जिल्हा परिषद व आरोग्य विभागात रंगू लागली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळत नसल्याची तक्रारही पुढे येत आहे.
या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून खोटी माहिती देणाऱ्या आरोग्य सेवकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आकाश कोकाटे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणात तातडीने कारवाई केली नाही तर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोकाटे यांनी दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
या आरोपांमुळे आरोग्य विभागातील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून “मुख्यालयात नसतानाही पगार कसा?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता प्रशासन या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करते की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यालयात नसतानाही कागदावर हजेरी – आरोग्य सेवकांचा भांडाफोड; कारवाई न झाल्यास आमरण उपोषण
