अकोला | प्रतिनिधी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी ठरलेल्या गोवंश चोरीच्या घटनांवर मोठा आळा घालत स्थानिक गुन्हे शाखेने ऑपरेशन ‘प्रहार’ अंतर्गत धडाकेबाज कारवाई करत अटल गोवंश चोराला जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल ११ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून ७ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ रोजी चांदूर (ता. जि. अकोला) येथील शेतकरी विलास लक्ष्मण कोगदे यांच्या शेतातून दोन बैल, दोन गायी व एक वासरू असा एकूण पाच गोवंश अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शेतकऱ्यांशी संबंधित आणि संवेदनशील स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या प्रकरणाच्या उकलसाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी विशेष पथके तयार करून समांतर तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अब्दुल जब्बार या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अकोला शहर व ग्रामीण भागातील एकूण ११ गोवंश चोरीचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.
या प्रकरणात दानीश (रा. अमरावती, सध्या कारंजा जि. वाशीम), काशीफ (अकोट फैल, अकोला) आणि वसीम कुरेशी (गवळीपुरा, कारंजा जि. वाशीम) यांचीही नावे समोर आली असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
कारवाईदरम्यान आरोपीकडून १ लाख ४० हजार ५०० रुपये रोख, १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली ३ चारचाकी वाहने असा एकूण ७ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासात खदान, एमआयडीसी, बार्शीटाकळी, पातूर आणि बाळापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अनेक गोवंश चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गोवंश चोरीच्या घटनांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ऑपरेशन ‘प्रहार’ची धडाकेबाज कारवाई : अटल गोवंश चोर जेरबंद; ११ गुन्ह्यांची उकल, ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
