तक्रारदार अरविंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
अकोला : बाळापूर तहसील अंतर्गत घडलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात आता मोठी कारवाई सुरू झाली असून सुधीर कन्स्ट्रक्शनचे प्रकल्प व्यवस्थापक लोकेश कटारिया यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. तब्बल ६४ लाख ८९ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावूनही तो अद्याप न भरल्यामुळे प्रशासनाने आता थेट मालमत्ता जप्तीची तयारी सुरू केली आहे.
तहसीलदार कुणाल झाल्टे (अकोला) यांनी बाळापूर तहसीलदारांना कडक शब्दांत पत्र पाठवत कटारिया यांच्या चल व अचल मालमत्तेचा सविस्तर तपशील तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात मोठी वसुली कारवाई होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
४१६ ब्रास मुरूम उत्खनन; कायद्याचा भंग
माहितीनुसार, लोकेश कटारिया यांनी माझोड (ता. अकोला) येथे शासकीय जमिनीवरून तब्बल ४१६ ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन केले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम ४७(७) अंतर्गत त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला होता.
परंतु, १२ जानेवारी २०२४ रोजीचा आदेश धाब्यावर बसवत त्यांनी अद्याप एकही रुपया भरलेला नसल्याचे प्रशासनाच्या नजरेत आले आहे.
आता थेट सक्तीची वसुली
प्रकरण गांभीर्याने घेत तहसील प्रशासनाने कलम १७६ अंतर्गत ही रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मालमत्ता जप्ती, बँक खात्यांवर कारवाई, तसेच इतर कायदेशीर पावले उचलण्याची शक्यता आहे.
तक्रारदार अरविंद पाटील यांचा धडाका
या संपूर्ण प्रकरणात तक्रारदार अरविंद देवलाल पाटील (रा. टाकळी खोजबोळ, ता. बाळापूर) यांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाला जागे केले. त्यांच्या ठोस भूमिकेमुळेच हे प्रकरण पुढे सरकले असून स्थानिक स्तरावर त्यांची भूमिका निर्णायक ठरत आहे.
प्रशासनानेही त्यांच्या तक्रारीची दखल घेत कारवाई सुरू केल्याने, बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पुढे काय?
आता सर्वांचे लक्ष आहे ते प्रशासनाच्या पुढील पावलांकडे…
कटारिया यांची मालमत्ता जप्त होणार का? की अखेर दंड भरून सुटका करून घेणार?
एक मात्र नक्की —
बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांना आता कायद्याचा चाबूक बसणार!
