Join WhatsApp group

पी.एम. किसान योजनेतून वंचित राहू नका! अकोला तालुक्यात ७ दिवसांची विशेष मोहीम सुरू


तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर यांचे शेतकऱ्यांना आवाहन
अकोला, दि. — प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेचा लाभ कोणत्याही पात्र शेतकऱ्यापर्यंत अखंडितपणे पोहोचावा, यासाठी अकोला तालुक्यात पुढील सात दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रलंबित ई-केवायसी (e-KYC), आधार-बँक संलग्नता (Bank Seeding), भूमी अभिलेख नोंदणी (Land Seeding) तसेच इतर तांत्रिक त्रुटींची पूर्तता करण्यात येणार आहे.
अकोला तालुक्यात पी.एम. किसान योजनेचे सुमारे ३५ हजार ५०० पात्र लाभार्थी आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नसणे, बँक खात्याशी आधार लिंक नसणे, भूमी अभिलेखांची नोंद अपूर्ण असणे किंवा मयत लाभार्थ्यांच्या वारसांची नोंद प्रलंबित असणे यांसारख्या कारणांमुळे अनेक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत.
या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने गावपातळीवर विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावागावांत दवंडी, व्हॉट्सअॅप संदेश आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करत आहेत.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
🔹
ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे त्यांनी त्वरित पी.एम. किसान अॅप किंवा जवळच्या सीएससी/सेतू केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी.
🔹 आधार-बँक संलग्नता (Bank Seeding) :
आधार लिंक नसल्यास संबंधित बँकेत संपर्क साधावा किंवा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मध्ये खाते उघडून प्रक्रिया पूर्ण करावी.
🔹 लँड सिडिंग व इन-अॅक्टिव्ह खाते :
लँड सिडिंग प्रलंबित असलेल्या किंवा खाते इन-अॅक्टिव्ह असलेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
🔹 मयत लाभार्थ्यांचे वारस :
मयत लाभार्थ्यांच्या वारसांनी ७/१२ उतारा, फेरफार उतारा (१ व २), मृत्यूचा दाखला आणि सर्व वारसांचे आधार कार्ड सादर करावे.
🔹 फार्मर आयडी अनिवार्य :
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी तयार केलेला नाही, त्यांनी तो तातडीने तयार करून घ्यावा.
सहकार्याचे आवाहन
“कोणताही पात्र शेतकरी पी.एम. किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी पुढील सात दिवसांत आपली प्रलंबित कामे पूर्ण करून कृषी विभागाला सहकार्य करावे,” असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर यांनी केले आहे.
—

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *