Join WhatsApp group

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग प्राणायाम शिबिराचे आयोजन

अकोला : आस्था योग फाउंडेशन तथा महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विशेष योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. 21 मे 2026 ते 21 जून 2026 या कालावधीत जानोरकर मंगल कार्यालय, अकोला येथे संपन्न होणार आहे.

अमरावती विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष उल्हासराव मोकळकर यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिराला योगप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 21 जून रोजी संपूर्ण भारतासह जगभरात साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या विशेष शिबिरामध्ये दमा, अस्थमा, मधुमेह, उच्च व कमी रक्तदाब, वजन नियंत्रण, मणक्याचे, कमरेचे व मानेचे विकार यांसारख्या विविध आजारांवर योगाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच षटकर्मातील नेती, धोती, नौली, बस्ती, त्राटक, कपालभाती, ध्यानमुद्रा, योगनिद्रा व विविध सूक्ष्म योगप्रकारांचा प्रत्यक्ष सराव अनुभवी योगतज्ज्ञांकडून करून घेतला जाणार आहे.

योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनशैलीचा आधार आहे. शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्थैर्य, तणावमुक्ती, सकारात्मक ऊर्जा व मनःशांती प्राप्त करण्यासाठी या शिबिराचा लाभ महानगरातील सर्व योगसाधक, योगप्रेमी व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *