तब्बल ९२ लाखांचा मुद्देमाल जप्त; अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल
अकोला, दि. १९ मे २०२६ : अकोला येथील MIDC-4 परिसरात विनापरवाना जैव उत्तेजकांची विक्री व साठवणूक सुरू असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाल्यानंतर जिल्हा भरारी पथकाने धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला.

या कारवाईत तब्बल ३८२७ लिटर व ३१,१४१ किलो वजनाचे २७ प्रकारचे जैव उत्प्रेरक जप्त करण्यात आले असून जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे ९२ लाख ५ हजार ५०० रुपये इतकी असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
ही कारवाई डॉ. तुषार जाधव, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद अकोला आणि सतीशकुमार दांडगे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, अकोला यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. गुप्त माहितीनुसार MIDC-4 परिसरात छापा टाकून संबंधित ठिकाणी सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीत विनापरवाना जैव उत्तेजकांचा मोठा साठा आढळून आल्याने संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली.

कारवाई पथकात कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) सुधाकर खंडारे, कृषी अधिकारी रोहिणी मोघाड, पंकज जगताप व पंकज झरे यांचा समावेश होता. फिर्यादी म्हणून सुधाकर खंडारे यांनी MIDC पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, ही कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, संचालक (निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, तंत्र अधिकारी नितीन लोखंडे तसेच कृषी अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
या धडक कारवाईमुळे विनापरवाना खत व जैव उत्प्रेरक विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून कृषी विभागाने अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
